तरुणांमध्ये क्रेझ बनलेल्या PUBG मोबाइल गेमला सायबर सुरक्षेच्या कारणास्तव भारतात बंदी घालण्यात आली आहे. मात्र PUBG गेम पुन्हा भारतात सुरु होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, PUBG मोबाइलची मूळ दक्षिण कोरियाची कंपनी गेल्या काही आठवड्यांपासून जागतिक क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी चर्चा करत आहे. केंद्र सरकारचा यूजर डेटा देशाबाहेर स्टोअर होत असल्याची चिंता व्यक्त करत ही कंपनी भारतातील यूजर्सचा डेटा भारतातच स्टोअर करण्याबाबत भागिदारांशी बोलत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेमिंग कंपनीने देशातील काही हाय-प्रोफाइल स्ट्रीमर्सना खासगी माहिती दिली आहे की या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात पुन्हा PUBG सुरू होईल अशी आशा आहे.
कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने PUBG इंडियाची एका कंपनीच्या रुपात नोंद केली आहे. त्यामुळे PUBG ला आता भारतात पुनरागमन करणं शक्य आहे. PUBG मोबाईल इंडियाचे २१ नोव्हेंबर २०२० रोजी बेंगळुरुमधील एका कंपनीच्या रुपात कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयात रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. कुमार कृष्णन अय्यर आणि ह्यूनिल सोहन हे PUBG इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. PUBG च्या अधिकृत लॉन्चिंगच्या आधी कंपनीकडून रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया पार पाडली जात आहे. एका माहितीच्या आधारे, PUBG मोबाईल इंडियाच्या यूजर्सना नवीन आयडी तयार करण्याची गरज नाही. त्यांना जुन्या आयडीचा वापर करता येऊ शकेल. PUBG चा इंडिया व्हर्जन हा ग्लोबल व्हर्जनपेक्षा थोडा वेगळा आणि अपडेटेड आहे. PUBG च्या युजर्सना व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कंपनीने हे पाऊल उचललं आहे. त्याचवेळी सोशल मीडियावर PUBG मोबाईल इंडियाच्या नावे एक ट्रेलर व्हायरल होत आहे. परंतु संबंधित ट्रेलर हा PUBG तर्फे लॉन्च करण्यात आला नसून तो खोटा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनी आपल्या भारताच्या भविष्यातील योजनांबद्दल घोषणा करू शकते. दिवाळीच्या दरम्यान अथवा या वर्षाच्या अखेरी पर्यंत कंपनी मार्केटिंग मोहिम राबवण्याचीही योजना आखत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र PUBG चे पुनरागमन जे अशा प्रकारचे गेम डेव्हलप करण्याच्या तयारीत आहेत, त्या गेम डेव्हलपर्ससाठी अडचण ठरू शकणार आहे. २ सप्टेंबर रोजी भारत सरकारने सायबर सुरक्षेसाठी PUBG सह ११८ मोबाइल अॅप्सवर बंदी घातली. डेटा सुरक्षेसाठी या सर्व अॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. परंतु भारतीय PUBG गेम पुन्हा सुरु होणार ही बातमी वाचूनच PUBG प्रेमींमध्ये एक आनंदाची लहर उमटली आहे.