विविध कंपन्या ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी कायम चढाओढ सुरु असतात. त्याच प्रमाणे ग्राहकांना ते विविध सुविधा सुद्धा उपलब्ध करून देत असतात. देशातील आघाडीची डिजीटल पेमेंट कंपनी असलेल्या पेटीएमने घोषणा केली आहे की, सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांनी पेटीएम वॉलेटद्वारे केलेल्या, स्वीकारलेल्या पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. सर्व यूपीआय आधारित पेमेंट अॅप्स आणि रुपे कार्ड तसेच पेटीएम वॉलेटद्वारे व्यापारी आता त्यांच्या बँक खात्यात कोणत्याही शुल्काशिवाय अमर्याद पेमेंट्स मिळवू शकतात. देशातील १.७ कोटीहून अधिक व्यापाऱ्यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.
पेटीएमचे वरीष्ठ उपाध्यक्ष कुमार आदित्य सांगतात की, “आम्ही देशभरातील आमच्या व्यापारी भागिदारांना अधिक सक्षम बनवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी आता कोणत्याही शुल्काची चिंता न करता पेटीएम वॉलेटद्वारे पेमेंट्स स्वीकारावेत. याद्वारे त्यांची अधिक बचतही होणार आहे. तसेच आता ते पेटीएमच्या ‘ऑल-इन-वन क्यूआर’ कोडद्वारे कोणत्याही यूपीआय अॅपकडून पेमेंट्सही स्वीकारु शकतील”. पेटीएमच्या या निर्णयानं देशभरातील व्यापाऱ्यांना सर्वच व्यवहारांसाठी एकमेकांना सहकार्य होण्यास मदत मिळणार आहे. व्यापाऱ्यांना, दुकानदारांना आता त्यांच्या काऊंटरवर अनेक प्रकारचे क्यूआर कोड ठेवण्याची गरज भासणार नाही. आत्ता त्यांना फक्त पेटीएमचा ‘ऑल-इन-वन क्यूआर’ आवश्यक आहे जेणेकरुन पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय आणि अन्य कोणत्याही यूपीआय अॅपकडून पेमेंट्स स्वीकारता येतील.
काही दिवसांपूर्वी पेटीएमने लघु उद्योजकांना कोणत्याही गॅरंटीविना १००० कोटी रुपयांचं कर्जवाटप करणार असल्याची घोषणा केली होती. मागील आर्थिक वर्षातही पेटीएमने अशा कर्जांचं वाटप केलं होतं. त्यावेळी या कर्जाची रक्कम ५५० कोटी रुपये इतकी होती. यावेळी ही तरतुद वाढवून १००० कोटी रुपये करण्यात आली आहे. ही योजना मार्च २०२१ पर्यंत लागू असणार आहे. पेटीएमने म्हटलं आहे की, “लघुउद्योजकांना ५ लाख रुपयां पर्यंतच्या ‘कोलॅटरल फ्री लोन’ योजनेचा विस्तार केला जात आहे. यासह कमी व्याज आणि हप्त्यांमध्ये कर्जफेड या सुविधाही दिल्या जाणार आहेत”.
पेटीएमने आपल्या व्यापारी कर्जवितरण योजनेंतर्गत अॅपवर कोलॅटरल फ्री लोन देण्याची व्यवस्था केली आहे. कर्जासाठी व्यापाऱ्यांची पात्रता त्यांच्या दैनंदिन व्यवहारांनुसार ठरवली जाणार आहे. पेटीएमने कर्ज देण्याच्या प्रक्रियेला डिजिटल केलं आहे. यात कर्जासाठी अर्ज करताना किंवा वितरणाला मंजूरी मिळण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची अथवा गॅरंटीची गरज असणार नाही. पेटीएमने कर्जाची मर्यादा मुख्यतः व्यापारातील व्यवहारांसाठी असणार आहे. या कर्जावर कोणतीही अधिकची शुल्क आकारणी नसेल.” असे स्पष्ट केले आहे.